( रत्नागिरी )
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑल आउट ऑपरेशन” राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार, हॉटेल्स, लॉज, संशयित वाहने इत्यादि रत्नागिरी पोलीसांमार्फत चेक करण्यात आली. या दरम्यानेच, खेड उपविभागामध्ये नाकाबंदी तपासणी व गस्त घालत असताना दापोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये वन्यजीवी प्राण्यांची अवैध शिकार करणारी टोळी वाहनासहीत फिरत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली. गोपनीय बातमी प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक पोलीस पथक तयार करण्यात आले. त्यामध्ये दोन पंचांचा देखील समावेश करण्यात आला.
या पथकाद्वारे दापोली येथील जंगलमय भागात गस्त घालण्यात आली व रात्री 03.00 वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा घेत वेगाने पुढे जाताना आढळून आले. ज्याच्या टपावर दोन इसम बसलेले दिसले व त्यामधील एक इसम आपल्या हातात 12 बोर रायफल घेऊन बसला होता. पथकाद्वारे या संशयित वाहनास जागीच थांबविण्यात आले व दोन पंचांसमक्ष वाहनाची झडती घेण्यात आली. झडती दरम्याने गाडीमध्ये इतर 3 इसम व बारा बोरची 15 जिवंत काडतुसे मिळून आली. चार जणांना ताब्यात घेण्यात आले. १) अक्षय बळिराम नागळकर (रा. घोडबंदर रोड, भाईंदर ठाणे) २) योगेश विठ्ठल तुरे (रा. टाळसुरे, दापोली) ३) सचिन कचेर पाटील, (रा. दापोडे भिवंडी, ठाणे व ४) कारण उर्फ बंटी शिवाजी ठाकूर (रा. भिवंडी ठाकराचा पाडा, ठाणे) या चारही जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्यांच्याकडून 1 बारा बोर बनावटीची रायफल, 15 जिवंत काडतुसे व एक टोयोटा क्वालिस वाहन, असा एकूण ₹ 3,03,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 101/2023 भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम 3(२५) अन्वये या चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरील नमूद चारही आरोपी हे दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची अवैध शिकार करण्यासाठी आलेले होते असे प्राथमिक चौकशी दरम्याने निष्पन्न झाले आहे तसेच गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, श्री. राजेंद्र मुणगेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. गंगधर, दापोली पोलीस ठाणे, चालक पोहेकॉ/६४५ एम. एच. केतकर, पोकॉ/१४४ विनय पाटील, खेड पोलीस ठाणे.