( रत्नागिरी )
आरोग्याची समस्या केव्हा, कुठे आणि कधी निर्माण होईल, हे सांगता येत नाही. संकटाच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. पण, हृदयविकाराने पीडित रुग्ण असो, प्रसूतीच्या कळा सोसणारी महिला अथवा अपघातातील जखमी असो यांच्या मदतीला १०८ या क्रमांक डायल केल्यावर काही वेळातच सुसज्ज अशी रुग्णवाहिका येऊन उभी राहते. त्यानंतर लगेचच नजीकच्या सरकारी वा जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाते. अशाच १७ रुग्णवाहिका मागील १० वर्षांमध्ये ३ हजार ५६० हृदयरोगी रुग्णांसाठी लाइफलाइन ठरल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णांना प्राथमिक उपचारांसह रुग्णसेवा आणि मोफत सरकारी रुग्णालयापर्यंतची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा १७ रुग्णवाहिका दररोज अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना रुग्णालयात पोहोच करण्यासाठी धावतात. या रुग्णवाहिकेत चालकासह एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतो. कार्डियाक रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचारांच्या सुविधांसह छोट्या रुग्णालय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
या १०८ रुग्णवाहिकेमुळे अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर प्राथमिक उपचार व वेळेत रुग्णालयात पोहोचल्यामुळे जीवदान मिळाले आहे. सर्वाधिक लाभ दुर्गम-अतिदुर्गम भागातील रुग्णांना झाला आहे. मागील दहा वर्षांमध्ये हृदयविकाराचा त्रास झालेल्या ३ हजार ५६० जणांचे प्राण वाचविण्यात मोलाचे काम १०८ रुग्णवाहिकेने केले आहे.
गेल्या पाच वर्षांतील कामगिरी
ग्रामीण भागापर्यंत सेवा
रत्नागिरी जिल्ह्यासाठी १०८ सुविधा असून, आजतागायत ही सेवा सुरळीत व प्रामाणिकपणे सुरू ठेवण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अत्यवस्थ रुग्णांपर्यंत १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका पोहोचली आहे. रुग्णाला सेवा मिळावी, या उद्देशाने आतापर्यंत या रुग्णवाहिकांची सेवा अविरतपणे सुरू आहे.