(मुंबई)
राज्यातील अनेक गोरगरीब रुग्ण मृत्यूच्या दाढेत असताना त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीनं समन्स पाठवले आहे. लोकांना कोरोनाची भीती दाखवून याच कोरोनात स्वतःची पोळी भाजणाऱ्या काही राजकारणी व अधिकाऱ्यांना कसलीच लाज राहिलेली नाही. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रकरणात हे समन्स बजावले गेले आहे, असे सांगितले जात आहे.
कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आता ईडीनं नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भातच आता ईडी अधिकाऱ्यानी चहल यांना चौकशीसाठी बोलवलं आहे.
करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या कोरोना केंद्रांतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले होते. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचंदेखील नाव होतं.