(पुणे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने नियमित शुल्कासह स्वीकारण्याचा कालावधी हा इयत्ता दहावीसाठी 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2023 व बारावीसाठी 10 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2023 असा निश्चित करण्यात आला होता. या मुदतीत काही विद्यार्थ्यांची नाव नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आता विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी 20 ते 30 सप्टेंबर अशी मुदतवाढ दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, अशी मुदत देण्यात आलेली आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी यादी संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी 5 ऑक्टोबरची मुदत दिलेली आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.