( खेड / इक्बाल जमादार )
इंडोनेशिया जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये जंगली वनस्पती पासून तयार करण्यात आलेली काताची पावडरची मुंबई – गोवा महामार्गावरून तस्करी होत असल्याची माहिती महाड वन विभागाला मिळाली. त्यानुसार महाड येथे पाळत ठेवण्यात आली होती. पोलादपूर येथे रत्नागिरीच्या दिशेने जाताना दोन ट्रकचा पोलिसाना संशय आला. या दोन्ही ट्रकची महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू यांनी चौकशी केली. तपासणी करताना गोणींमध्ये भरलेली काताची पावडर त्यांना आढळून आली. या पावडरची किंमत अंदाजे एक कोटी रुपये असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. साहू यांनी लगेचच त्या दोन ट्रक चालकांना ताब्यात घेतले. दीपक घोसाळकर (रा. बोरज, ता. खेड) आणि सचिन कदम (रा. खोपी, ता. खेड) अशी त्या दोन ट्रक चालकांची नावे आहेत.
दरम्यान त्यांच्याकडे या मालाचा वाहतूक परवाना किंवा बिलाची चौकशी केली असता कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. तसेच ती पावडर तपासणीसाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. दोन्ही चालकांवर वनसंरक्षण कायदा ४१ आणि ४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.