राज्यात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही अशा विविध तक्रारी समोर येत आहेत. यात आता ठाकरे सरकारनं वृत्तपत्रात दिलेल्या एका जाहिरातीमुळे विरोधी पक्ष भाजपानं महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली आहे.
ठाकरे सरकारनं मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढले आहे. याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना अशा शब्दात त्यांनी रोहित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.