(मुंबई / किशोर गावडे)
हरियाणा येथे होणाऱ्या “६९व्या महिला राष्ट्रीय” कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला संघ जाहीर केला. मुंबई शहरच्या पूजा यादव हिच्या खांद्यावर महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. हरियाणा राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने दि. २३ ते २६ मार्च या कालावधीत आनंद गड येथे मॅटवर ही स्पर्धा खेळविण्यात येईल.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झालेल्या “६९व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धेतून महाराष्ट्राचा हा संघ निवडण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या या संघात पुण्याने बाजी मारली असून त्यानंतर मुंबई शहराचा नंबर लागतो. निवडण्यात आलेला हा संघ प्रशिक्षिका शीतल मारणे-जाधव हिच्या मार्गदर्शनाखाली राज्य कबड्डी असो.च्या सभागृहात मॅट वर सराव करीत आहे. दि. २२ मार्च रोजी दुपारी १२-०० वाजता वांद्रे टर्मिनस येथून हा संघ स्पर्धेकरीता रवाना होईल. निवडण्यात आलेला हा संघ एका पत्रकाद्वारे राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी आज प्रसार माध्यमांकरिता जाहीर केला.
महिलांचा संघ :- १)पूजा यादव (संघनायिका), २)सायली जाधव, ३)अंकिता जगताप, ४)पूजा शेलार, ५)स्नेहल शिंदे, ६)आम्रपाली गलांडे, ७)सिद्धी चाळके, ८)पूजा पाटील, ९)हरजित कौर संधू, १०)पौर्णिमा जेधे, ११)प्रतिक्षा तांडेल, १२)सायली केरीपाळे. तर प्रशिक्षिका म्हणून शीतल मारणे-जाधव व व्यवस्थापिका श्रद्धा गंभीर काम पहातील.