कोरोनाची दुसरी लाट आपण पहातोय मात्र तिसरी लाट ही भयानक असू शकते, त्यासाठी शासन म्हणून तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन खंबीर असल्याचे सांगत जिल्ह्यात पाली, रायपाटण, संगमेश्वर, लांजा, मंडणगड या ५ तालुक्यात आणखी ५ नवे ऑक्सिजन प्लँँट सुरु करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्याचे मेडिकल बुलेटिन दर ४ दिवसांनी होईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यानुसार सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ना. सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाबत माहिती दिली.
यावेळी बोलताना ना. सामंत यांनी सांगितले की, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस जाहीर केली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ५२०० प्राप्त झाले आहेत. ५ केंद्रांवर ७ दिवसात ट्रायल बेसवर लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात लसीकरण केंद्र सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस्ऍपवर लसीकरणाबाबत एक पोस्ट फिरत आहे, याबाबत खुलासा करताना ना. सामंत यांनी ती पोस्ट खोटी असल्याचे सांगून ज्यांची ऑनलाईन नोंदणी होईल त्यांनाच लस मिळणार आहे. मात्र ज्या ठिकाणी लसीकरण सुरु आहे त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करा व लस घ्या अशा आशयाची पोस्ट साफ खोटी असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले
सध्या २ कंपन्यांच्या लसीचे डोस उपलब्ध होत आहेत. राज्य सरकारने हाफकीनला ५५ कोटी रु. लस निर्माण करण्यासाठी अदा केले आहेत. त्यानुसार पुढील २ महिन्यानंतर राज्यात मुबलक लस उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, दुसरी लाट आपण पहातोय मात्र तिसरी लाट भयानक असू शकते. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आणखीन ५ नवे ऑक्सीजन प्लँट सुरु करणार असल्याचे सांगून पाली, रायपाटण, संगमेश्वर, लांजा, मंडणगड आदी ठिकाणी हे प्लँट सुरु करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागच्या वर्षी होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेेशन केलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारले जात होते. तीच पद्धत आता पुन्हा सुरु केली जाणार आहे. होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशनमध्ये असलेला रुग्ण घराबाहेर फिरत असल्याने त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे.
यापूर्वी होम आयसोलेशन व होम क्वारंटाईनसाठी वेगवेगळे शिक्के हातावर मारले जायचे. मात्र सिंधुदुर्ग पॅटर्नप्रमाणे रत्नागिरीत देखील बोटाला निवडणूक प्रक्रियेत वापरली जाणारी शाई लावली जाणार आहे. डाव्या हाताला शाई असेल तर होम आयसोलेशन व उजव्या हाताला शाई असेल तर होम क्वारंटाईन असे निकष ठरविण्यात आले आहेत.