(चिपळूण)
गोशाळेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या ४ दिवसांपासून खेड तालुक्यातील लोटे गोशाळेजवळ आमरण उपोषणाला बसलेल्या भगवान कोकरे यांची गुरूवारी प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांनी रुग्णालयात यावे यासाठी वैद्यकीय अधिकारी त्यांची मनधरणी करीत आहेत. असे असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिला आहे.
कोकरे हे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून लोटे एमआयडीसीत गोशाळा चालवत आहेत. या गोशाळेत सध्या ११०० गोवंश आहेत. असे असताना आता ही जागा अनधिकृत आहे, असा मुद्दा पुढे आणण्यात आला. चुकीची कागदपत्रे दाखवून शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा योजनेंतर्गंत आतापर्यंत गोशाळेसाठी ७५ लाखांचे शासन अनुदान घेतल्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवा, उर्वरित २५ लाखांचे अनुदान तत्काळ द्या, या मागणीसाठी गेल्या ४ दिवसांपासून कोकरे हे गोशाळेतच उपोषणाला बसले आहेत. मात्र या उपोषणाकडे प्रशासकीय यंत्रणेने पाठ फिरवली आहे. त्यातच पत्नी जयश्री कोकरे व अन्य नातेवाईकही रूग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतानाही ते कोणाचेही ऐकत नसल्याने प्रकृती आणखी ढासळण्याची शक्यता आहे.