(डॉमनिका)
रोहित शर्माने ४२१ धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजला १५० धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच विकेटच्या मोबदल्यात ४२१ धावा केल्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (१७१) आणि रोहित शर्मा (१०३) यांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडे सध्या २७१ धावांची आघाडी आहे.
अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या डावा १५० धावांत रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी खो-याने धावा चोपल्या. विशेषकरुन रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी प्रभावी कामगिरी केली. शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही.
यशस्वी जयस्वाल याने पदार्पणातच १७१ धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वीने १६ चौकार आणि एक षटकार लगावला तर रोहित शर्माने १०३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन चौकार आणि दहा षटकार लगावले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी २२९ धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल तिस-या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पण शुभमनला मोठी खेळी करता आली नाही. शुभमन अवघ्या सहा धावा काढून तंबूत परतला. गिल तंबूत परतल्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताचा डाव सावरला.
रोहित शर्मा आणि गिल यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी ११० धावांची भागिदारी केली. अल्जारी जोसेफ याने यशस्वी जयस्वाल याला १७१ धावांवर बाद करत वेस्ट इंडिजला आजच्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यशस्वी बाद झाल्यानंतर भारताची सर्वात अनुभवी जोडी मैदानात होती. पण अजिंक्य रहाणेला संधीचे सोनं करता आले नाही. अजिंक्य रहाणे तीन धावांवर केमर रोचचा शिकार झाला.