रत्नागिरी : जिल्ह्यात १० लाख लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे. तिसरी लाट आल्यास त्याचा विपरीत परिणाम जास्त प्रमाणात होऊ नये, म्हणून सर्वांनी लस घेतली पाहिजे. पुढील तीन महिन्यांत, ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. या हेतूनेच बोर्डिंग रोड येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. शिवाय शहर व लगतच्या गावांमधील ग्रामस्थांसाठी दिवसाला किमान २०० च्या मागणीनुसार शिबिरे घेण्यात येणार आहेत. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने (पुणे) कोव्हीशिल्ड लस मोफत दिली आहे. समाजातील गोरगरीब जनतेला ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार, दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्र तथा बाळ माने यांनी दिली.
बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक (कोंढवा, पुणे), सिरम इन्स्टिट्यूट (पुणे), पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान पुणे, प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स,पुणे (पीपीसीआर), दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेज, मुकुल माधव फाउंडेशन, पुणे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविशिल्ड लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती बाळ माने यांनी दिली.
श्री. बाळ माने यांनी सांगितले, मोफत लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. सध्या पाच हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. मागणीनुसार त्या देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसापासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा सप्ताह सुरू आहे. त्या अंतर्गत रत्नागिरीतील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून सुरवात केली जाणार आहे. ज्या नागरिकांना परदेशी जायचे आहे त्यांनाही लस देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी
फोन नंबर- 02352- 356033
फक्त व्हाट्सपसाठी 8208876273 / 8087239377 / 9545195333 क्रमांकावर संपर्क साधावा.
रत्नागिरी शहरातील व लगतच्या ग्रामपंचायतमधील परिसरातील नागरिकांनी स. रा. देसाई अध्यापक विद्यालय केंद्रात संपर्क साधावा. दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. रविवारी सुद्धा लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. येथे ऑनलाईन आणि ऑनस्पॉट नोंदणी करणाऱ्यांना मोफत लस देण्यात येईल. तसेच सडामिऱ्या, जाकिमिऱ्या, शिरगाव, कासारवेली, मिरजोळे, मजगाव, केळ्ये, फणसवळे, खेडशी, पानवल, कारवांचीवाडी, नाचणे, कर्ला, फणसोप, भाट्ये आणि गोळप या ग्रामपंचायत भागातील ग्रामस्थांनीही लाभ घ्यावा. या ग्रामपंचायतींनी प्रति दिवसाला २०० लाभार्थ्यांची नावनोंदणी केल्यास गावातच लसीकरण शिबिर आयोजित केले जाईल.
दरम्यान, १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तसेच आयसीएमआरच्या आदेशानुसार लवकरच १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण करण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन नोंदणीला सुरवात
१ ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर आणि 3 ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या लसीकरणाकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून Appointment घेणे बंधनकारक आहे. www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी दि यश फाउंडेशन, रत्नागिरी या केंद्राअंतर्गत Oniline Appointment घ्यावी.
नोंदणी करताना आपणास सशुल्क (Paid) दिसले तरी सर्व लसीसाठी किंवा सेवाशुल्क म्हणून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. लसीकरण संपूर्णपणे मोफत आहे, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले आहे.