(वॉशिंग्टन)
२००८ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने दाखल केलेली रिट याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी राणाला आता लावकरच भारतात आणले जाऊ शकते. भारताच्या ताब्यात दिले जाऊ नये म्हणून पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस रिट दाखल केली होती.
लॉस एंजलिसच्या जिल्हा न्यायालयाने १६ मे च्या आदेशात म्हटले होते की, भारताने तहव्वूरला भारताकडे सोपवण्याची मागणी ज्या आरोपांच्या आधारे केली आहे, त्याचा विचार करून त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते. यावेळी अमेरिकन न्यायालयाने ४८ पानांच्या आदेशात मुंबई दहशतवादी हल्ल्यातील राणाची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, या निर्णयाविरोधातील रिट फेटाळल्यानंतर राणा यांनी नव्या सर्किट कोर्टात दुसरे अपील दाखल केले आहे. त्यामुळे आता सुनावणी होईपर्यंत भारताच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती राणाने यात केली आहे. या प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आले असता, त्यांच्याकडून कोणतेही विशेष उत्तर मिळाले नाही. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे.
तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी कॅनडियन व्यावसायिक आहे. तो पाकिस्तानच्या लष्करात अनेक वर्ष डॉक्टर म्हणून कार्यरत होता. नंतर त्याने कॅनडात स्थलांतर केले. त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले आहे. मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात असल्याचे तपासात आढळले आहे. तेव्हापासून राणा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड यादीत आहे.