(रत्नागिरी / प्रतिनिधी)
२०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर भारतीय तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा संकल्प अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकावून साजरा करण्याचा संकल्प ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने २६ जानेवारी, २०२४ रोजी अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व जिल्हा शाखा, गिर्यारोहण संस्था, शिवप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून आणि तमाम शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या सहभागातून संपन्न होणार आहे. यासाठी किल्ल्यांचा वेगवेगळ्या विभागात विभागणी करण्यात आली असून विभाग निहाय ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगाच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. यामध्ये महासंघाकडे नाव नोंदणी करून आपल्या जिल्ह्यातील किल्ल्यावर जाऊन या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार आहे. याबाबत नोंदणी प्रक्रिया, सविस्तर कार्यक्रम व इतर सर्व माहिती सर्वांसाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
गिर्यारोहण, साहस व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास यांची सांगड अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ नेहमीच घालत असतो व त्यातून नवनवीन अभिनव उपक्रम राबवत असतो. हा देखील त्यांपैकीच एक उपक्रम असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिक तपशीलवार माहिती जाहिर करण्यात येईल अशी माहिती रत्नागिरीतील गिर्यारोहण महासंघाचे सदस्य राजेश नेने यांनी दिली.