(मुंबई)
२०१९ मध्येच जे करायला पाहिजे होतं ते आम्ही ३ महिन्यांपूर्वी केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलाखती दरम्यान म्हणाले होते. यावर २०१९ ची चूक सुधारायला अडीच वर्ष का लागली? असा खडा सवाल नाना पाटेकर यांनी विचारला. एकनाथ शिंदे यांनी अनैसर्गिक आघाडी नको होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत बंड घडवून आणले व भाजपच्या पाठिब्यांवर सरकार बनवले. याबाबत लोकमत “महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” पुरस्कार सोहळ्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रश्न करत मुख्यमंत्र्यांना थोडावेळ बुचकळ्यात टाकले.
आम्हाला बहुमत मिळाले होते. भाजपाचे १०० हून अधिक आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. सर्व मतदारांना वाटलं होतं की बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. मात्र, दुर्दैवाने तसं झालं नाही. मात्र ही चूक आम्ही तीन महिन्यांपूर्वी दुरुस्त केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर नाना पाटेकर यांनी हे करायला अडीच वर्ष का लागली, असा प्रश्न केला.
यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, असे व्हायला वेळ लागला कारण, या सगळ्या गोष्टी घडवून यायला योग्य वेळ व काळ यावा लागतो. दरम्यानच्या काळात कोविड होता. त्या काळात असं काही केलं असतं तर कोविड असताना असं का करताहेत, असा प्रश्न जनतेनेच विचारला असता. त्या काळात आम्ही त्या मार्गाने प्रयत्न करत होतो. अखेर तीन महिन्यांपूर्वी आम्ही तुमच्या मताचा आदर केला, या शब्दात एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.