(नवी दिल्ली)
२००० रुपयांची नोटबंदी झाल्यानंतर लोकांमध्ये आता ५०० रुपयांची नोटही बंद होणार अशी अनेक दिवस चर्चा सुरु आहे. सरकारनेच यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. तर १००० रुपयांची नोट पुन्हा सुरू करण्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. मान्सून सत्रात अर्थमंत्रालयाला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अर्थमंत्रालयाने ५०० रुपयांची नोट चलनातून बाद करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याशिवाय १००० रुपयांची नोट पुन्हा सुरू करण्याबाबतही इन्कार केला आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. त्यामध्ये जून्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्याच्या बदल्यात रिझर्व्ह बँकेने ५०० आणि २००० रुपयांची नवी नोट दाखल केली होती. मात्र आता मे महिन्यात २००० ची नोट बंद करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. ही डेडलाईन वाढवण्याबाबतही सरकारने नकार दिला आहे. देशात इतर चलनी नोटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान २००० रुपयांची नोट ही एकूण नोटांच्या २.५१ टक्के आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, जून २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ०.८४ लाख कोटी रुपये आहे. तर मे २०२३ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची एकूण किंमत ३.५६ लाख कोटी आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे २ हजाराच्या नोटा असतील तर त्या लवकरात लवकर बँकेत परत करा, असे आवाहनही केंद्र सरकारने यावेळी केले.