(नवी दिल्ली)
कोणतेही महत्त्वाचे काम करत असताना अनेकदा नको असलेले कंपन्यांचे फोन येतात. यामुळे आपल्याला खूप मनस्ताप होतो. हीच बाब लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल कंपन्यांना १ मेपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर बसवण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे लोकांना नको असलेल्या फोनमुळे होणार मनस्ताप थांबणार आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या तत्त्वांनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज स्पॅम फिल्टर हे नको असलेले फोन थांबवतील, म्हणजेच ग्राहकांच्या नंबरपर्यंत पोहोचणार नाहीत. यामुळे महत्त्वाच्या कामाच्या वेळात येणारे नको असलेले फोन किंवा स्पॅम फोन त्रास देऊ शकणार नाहीत. त्यापूर्वीच ते फोन कनेक्शन थांबवले जाईल. या सेवेसाठी सर्व मोबाईल कंपन्यांना एकच कॉमन प्लॅटफॉर्म असणार आहे. या कॉमन प्लॅटफॉर्मवर कंपन्यांना ब्लॉक नंबरची माहिती द्यावी लागेल. या कारवाईसाठी ट्रायने कंपन्यांना १ मेपर्यंत मुदत दिली आहे. १ मेनंतर अशा नंबरवरून येणारे फोन फक्त नेटवर्कवर ब्लॉक करावे लागतील.
दरम्यान यामुळे बँक आणि इतर महत्त्वाची माहिती असलेले नंबर देखील ब्लॉक होऊ शकतात. याबाबत ट्रायने सांगितले आहे की, बँक, आधार किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेशी संबंधित मेसेज आणि फोनसाठी स्वतंत्र सीरीज नंबर जारी केले जातील. याशिवाय इतर सर्व नंबर ब्लॉक केले जातील.