( मुंबई )
वीज ग्राहकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे. आधीच महागाईचा झटका बसलेल्या जनतेला आता महाविरणाच्या बिलाचा मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये १ एप्रिलपासून वीजेचे दर वाढणार असल्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला आहे. त्यातच देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविणाऱ्या कोल इंडियाने देखील कोळशाच्या किंमती वाढविण्यास मजबूत कारण असून ही दरवाढ लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे.
कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी आज सोमवारी याची माहिती दिली. कोळशाच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत आणि ही वाढ लवकरच केली जाऊ शकते. त्यासाठी उच्च पदस्थांशी चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. २०२५ – २६ पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचे लक्ष्य गाठेल असेही ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत ही दरवाढ झालेली नाही. यंदा कामगारांच्या पगारावरही चर्चा झाली आहे. त्याचा परिणाम कोल इंडियाच्या आर्थिक परिस्थितीवरही होणार आहे. जेथे मनुष्यबळाचा खर्च खूप जास्त आहे अशा उपकंपन्यांमध्ये याचा परिणाम जाणवेल. यामुळे ही दरवाढ करणे अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात २५ ते ३० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतू, कोल इंडियाने कोळशाचे दर वाढविले तर राज्याला आणखी दरवाढ करावी लागण्याची शक्यता आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील बजेटनंतर १ एप्रिलपासून वीज दरवाढ होईल असे म्हटले आहे. मात्र असे झाल्यास आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.