(मुंबई)
मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) क्वार्टरमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शीतपेयात अमली पदार्थ मिसळून पीडितेला ते प्यायला लावल्यानंतर आरोपींनी बलात्कार केला. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. ही घटना चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत बुधवार व गुरुवार दरम्यान घडली.
पीडित मुलगी तिच्या वडिलांना प्रदान केलेल्या क्वार्टरमध्ये राहते, जे बीएआरसी मध्ये कार्यरत आहेत. मुलीचे वडील कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे इतरत्र राहतात. या प्रकरणातील एक २६ वर्षीय आरोपी देखील पीडितेच्या त्याच इमारतीत राहतो. त्याचे वडील देखील बीएआरसीमध्ये काम करतात. आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखत होते. आरोपीचे कुटुंबीय बाहेर गेले असता त्यांनी बुधवारी रात्री त्याच्या एका मित्राला राहत्या घरी बोलावले. आरोपींना स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शन कुकिंग सिस्टिमची गरज होती. त्याने पीडित युवतीला बोलावून इंडक्शन कुकिंग आणण्यास सांगितले.
पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली, तिथे काही वेळ थांबून आरोपी आणि त्याच्या मित्राशी बोलली. नंतर आरोपीने तिला अमली पदार्थ मिसळलेले शीतपेय दिले. पीडित युवतीने शीतपेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध पडली. ही संधी साधून आरोपी आणि त्याच्या मित्राने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, साधारण साडेबाराच्या सुमारास मुलगी शुद्धीवर आली असता तिला घडला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने आपल्या फ्लॅटकडे धाव घेतली. तसेच, तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती तिने आपल्या जवळच्या लोकांना दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 328 (विषाने दुखापत करणे), 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दिवशी आरोपींना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींच्या घरातून स्पाइक केलेल्या कोल्ड्रिंकचे नमुनेही गोळा केले आहेत. जे सध्या फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी २६ आणि ३० वयोगटातील दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.