राजस्थानची १९ वर्षीय नंदिता गुप्ता ही यंदाची फेमिना मिस इंडिया २०२३ विजेती ठरली आहे. नंदिनी पाठोपाठ नवी दिल्लीची श्रेया पुंजा दुसर्या तर मणिपूरची थोनाओजम स्ट्रेला ही तिसर्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. देशातील ३० राज्यातील विजेत्या स्पर्धकांपैकी पहिल्या तिघींची निवड करण्यात आली. त्यामध्ये नंदिनी गुप्ता हिने बाजी मारली. मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये हा शानदार सोहळा पार पडला.
गेल्यावर्षीची फेमिना मिस इंडिया २०२२ विजेती कर्नाटकची सिनी शेट्टी हिने नंदिनीच्या डोक्यावर मुकुट चढवून अधिकृतपणे तिला मिस इंडिया २०२३ किताब बहाल केला. तर राजस्थानची माजी पहिली उपविजेता रुबल शेखावत आणि उत्तर प्रदेशची माजी दुसरी उपविजेता शिनात चौहान यांनी अनुक्रमे श्रेया आणि थोनाओजम यांना मुकुट घातला. आता नंदिनी गुप्ता ही पुढील मिस वर्ल्ड २०२४ साठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मूळची राजस्थानच्या कोटा शहरातील रहिवासी असलेली नंदिनी १९ वर्षांची असून ती व्यवसाय व्यवस्थापनाच्या पदवी संपादन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिच्या मते लहान वयातील अपयश हेच स्वतःची मोठी ओळख निर्माण करण्यासाठी मदत करत असते. लहान अपयशी पचवूनच पुढे जाणे प्रेरणादायी असते. हा मिस इंडिया कार्यक्रम इंफाळ शहरातील खुमान लंपक स्टेडियमवर पार पडला. यावेळी बॉलीवूड स्टार अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, नेहा धुपिया, भूमी पेडणेकर आणि मनीष पॉल यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.