(मुंबई)
सतराव्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली.
बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि. सांगली येथे हे संमेलन होणार असून शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विभागामार्फत संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन मंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी केले.
या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इलदे या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत.