(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेअंतर्गत विश्वबंधुत्व व एकत्वाचा दिव्य संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांचे रत्नागिरीत आगमन होत आहे. त्यांच्या सान्निध्यात दि. १६ मार्च रोजी सांय ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत एक दिवसीय निरंकारी संत समागमाचे आयोजन उद्यमनगर शिरगाव येथील एम. आय. डी. सी. मधील चंपक मैदानावर करण्यात आले आहे. एक दिवसीय संत समागमांची ही अविरत श्रृंखला अशीच सुरू ठेवत रत्नागिरीनंतर राज्यातील सांगली शहर तसेच गोवा राज्य येथे असेच एकदिवसीय संत समागम आयोजित केले जाणार आहे.
सद्गुरू संत महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित होत असलेल्या या विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमाचा आंनद प्राप्त करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्या व्यतिरिक्त मुंबई-पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, लांजा, राजापूर तसेच आजूबाजूच्या भागातून हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित राहणार आहेत. सद्गुरुंच्या आगमनाच्या प्रति भक्तगणांमध्ये अद्भुत उत्साह व हर्षोल्हासाचे वातावरण दिसून येत आहे.
या संत समागमांचा उद्देश मानवामध्ये मानवी मूल्यांचा संचार करून अवघ्या विश्वामध्ये मानवतेने युक्त शांतीसुखाचे सुंदर वातावरण स्थापित करणे हाच आहे. या संत समागमाला सर्वच प्रभूप्रेमी भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्षेत्र क्रमांक ४० चिपळूणचे क्षेत्रीय प्रबंधक प.पू. प्रकाश म्हात्रे यांनी केले आहे.