(रत्नागिरी)
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांनी हापूसची अमेरिकावारीला मुहूर्त मिळाला आहे. अमेरिकेच्या पथकाने वाशी येथील विकीरण केंद्राची ६ एप्रिलला तर त्यानंतर लासलगाव येथील केंद्राची पाहणी करुन निर्यातीला हिरवा कंदिल दिला. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही ठिकाणाहून सुमारे १५ टन आंबा अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आला आहे. त्यात हापूसचा टक्का अधिक आहे; मात्र स्थानिक बाजारात दर चढे असल्यामुळे आणि हवाई वाहतुकीचा किलोचा दर तिप्पट झाल्याने निर्यातीकडील कल कमी आहे.
भारतातील आंब्याला विविध देशांमध्ये मोठ्याप्रमाणात मागणी आहे. निर्यातीपुर्वी विविध प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अमेकिरेला आंबा पाठविताना विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. वाशी, लासलगाव या दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. हंगाम सुरु करण्यापुर्वी अमेरिकेतील कृषी विभागाकडून विकिरण केंद्रांची पाहणी करुन सर्टिफिकेट दिले जाते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अमेरिकेतील पथकाला भारतामध्ये येणे शक्य झाले नव्हते. परिणामी हापूसची अमेरिकेला निर्यातच झाली नाही. भारतामधून सुमारे शंभर टनाहून अधिक आंब्याची निर्यात केली जाते. त्यातील वीस टक्के हापूसचा समावेश असतो. ४ एप्रिलला अमेरिकेच्या पथकाने वाशीसह लासलगाव येथील केंद्रांची पाहणी करुन निर्यातीला हिरवा कंदिल दिला. त्यानंतर वाशीमधून ६ एप्रिलला १२०० किलो हापूस प्रक्रिया केल्यानंतर हवाईमार्गे पाठविण्यात आला. आतापर्यंत वाशीतून १२ टन विविध प्रकारचे आंबे रवाना झाले असून त्यातील हापूस ५० टक्के आहे. हे आंबे सॅन फान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेन-रशिया युध्दामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा फटका हापूस निर्यातीलाही बसला आहे. विमानाने होणार्या वाहतुकीसाठी किलोला ५५० रुपये आकारले जात आहे. हाच दर पुर्वी १७५ रुपये प्रतिकिलो होता. दरात तिप्पट वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना बसला आहे.