(नवी दिल्ली)
भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला १२ लाखांची लाच घेताना रंगेहात सीबीआयने अटक केली. एका रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला ठोठावलेल्या दंडाच्या रक्कमेत तडजोड करण्यासाठी या अधिकाऱ्याने १२ लाखांची लाच मागितली होती. मंगळवारी, सीबीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ऋषी राज असे अटक केलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. आरोपीने दिल्लीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची तपासणी केली आणि तक्रारकर्त्याला (त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या) हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची माहिती दिली. या अनियमिततेसाठी १५ कोटींचा दंड ठोठावला जाऊ शकतो असे आरोपी अधिकाऱ्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला सांगितले.
आरोपी ऋषी राजने हे प्रकरण तडजोड करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दंडाच्या रक्कमेऐवजी १२ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सीबीआयने लाच स्वीकारताना ईपीएफओ अधिकारी ऋषी राजला रंगेहात अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली.