(नवी दिल्ली)
भारत सरकारने १२० प्रलय बॅलेस्टिक मिसाईच्या खरेदीला परवानगी दिल्याने भारतापासून सावध राहत चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती आता थांबणार आहेत. हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. संरक्षण मंत्रालयाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत सशस्त्र दलांसाठी सुमारे १२० क्षेपणास्त्रे खरेदी करून चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यास मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांची रेंज आवश्यकतेनुसार वाढवता येणार आहे.
२०१५ मध्ये प्रलय क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी काम सुरु झाले होते. दिवंगत जनरल बिपीन रावत यांनी या प्रोजेक्टवर भर दिला होता. मागच्या वर्षी २१ डिसेंबर आणि २२ डिसेंबरला सलग दोन वेळा या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली होती.
प्रलय हे अर्धखंडीय पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे मिसाईल आहे. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र हवाई दलात सामील केले जाईल. त्यानंतर भारतीय सैन्य दलामध्ये त्याचा सहभाग होईल. संरक्षण मंत्रालयाच्या स्तरावर या मिसाईलला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन आणि वापराचा मार्ग मोकळा झाला आहे.