(मुंबई)
वेतन वाढीसाठी पुकारलेल्या ऐतिहासिक संपानंतर आणि राज्यात सत्ता बदल झाल्यानंतरही एसटी कर्मचा-यांची ससेहोलपट सुरूच आहे. एसटी कर्मचा-यांना १० तारीख उलटूनही वेतन मिळाले नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला आहे. राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान सुरू असून शिंदे-फडणवीस सरकारची कामगारविरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोपही महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.
एसटी कर्मचा-यांच्या संपात वेतनासाठी ४ वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १० तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचा-यांना वेतन मिळालेले नाही, हा न्यायालयाचा अवमान आहे. सरकार कर्मचा-याशी लांडीलबाडी करीत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल, असा इशारा महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला.