(यशवंत नाईक)
17 मार्च, गुरुवार रात्री होळीचे दहन केले जाईल. होळी दहनापूर्वी महिला होळीची पुजा करतात. होळीची पुजा केल्याने घरात सुख-शांती तसेच पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच धन-धान्याची कधीच कमतरता जाणवत नाही. असा आहे होळी पुजनाचा विधी.
आवश्यक सामग्री-रांगोळी, तांदूळ, फूल, हळकुंड, मुग, बत्ताशे, नारळ, इत्यादी
पुजेचा विधी
एका ताटामध्ये पुजेसाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री घ्यावी. सोबत एक पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन होळीचे दहन ज्या ठिकाणी केले जाणार आहे तेथे खाली दिलेल्या मंत्राचा जप करत स्वत:वर व पुजेच्या सामग्रीवर थोडे-थोडे पाणी शिंपडत जावे –
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु,
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु,
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु।
वरील मंत्राचा जप झाल्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी, तांदूळ, फूल आणि दक्षिणा घेऊन खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करावा –
ऊं विष्णु: विष्णु: विष्णु: श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया अद्य दिवसे कीलक नाम संवत्सरे संवत् 2077 फाल्गुन मासे शुभे शुक्लपक्षे पूर्णिमायां शुभ तिथि भानुवासरे–गोत्र (स्व गोत्राचा उच्चार करावा) उत्पन्ना–(जन्मनावाचा उच्चार) मम इह जन्मनि जन्मान्तरे वा सर्वपापक्षयपूर्वक दीर्घायुविपुलधनधान्यं शत्रुपराजय मम् दैहिक दैविक भौतिक त्रिविध ताप निवृत्यर्थं सदभीष्टसिद्धयर्थे प्रह्लादनृसिंह होली इत्यादीनां पूजनमहं करिष्यामी।
गणेश-अंबिका पूजन
हातामध्ये फुल व तांदूळ घेऊन श्री गणेशाचे ध्यान करावे –
ऊं गं गणपतये नम: आह्वानार्र्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
गणपतीला फुल, कुंक आणि अक्षता समर्पित कराव्यात
ऊं अम्बिकायै नम: आह्वानार्र्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि सर्मपयामि।।
देवी अंबिकेचे ध्यान करत पंचोपचार पूजेसाठी गंध, तांदूळ फूल अर्पण करावे.
ऊं नृसिंहाय नम: आह्वानार्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
भगवान नृसिंहाचे ध्यान करत पंचोपचार पूजेसाठी गंध, तांदूळ फूल अर्पण करावे.
ऊं प्रह्लादाय नम: आह्वानार्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
प्रह्लादाचे स्मरण करत मनोभावे नमस्कार करून गंध, तांदूळ फूल अर्पित करावे.
आता खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करत दोन्ही हात जोडून उभे राहून मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी –
असृक्पाभयसंत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै: अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव:।।
मंत्राचा उच्चार झाल्यानंतर गंध, अक्षदा, फुल, पूर्ण मुग, संपूर्ण हळकुंड, नारळाला कच्चे सुत बांधून होळीसमोर ठेवावे आणि हात जोडून होळीला तीन, पाच अथवा सात प्रदक्षिणा घालाव्या.
मुहूर्त
संध्याकाळी 4.05 ते 05.05 पर्यंत (होलिका पूजा मुहूर्त)
संध्याकाळी 7.35 ते 8.35 पर्यंत (होलिका दहन मुहूर्त )
होळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजन सामग्री अर्पण केली जाते. उदा. शेणाऱ्या गोवऱ्या, नारळ, अक्षता प्राचीन काळापासून होळीसमोर अर्पित करण्यात येणा-या सामग्रीचे खास महत्त्व आहे –
ओंबी -हे नवीन धान्याचे प्रतिक आहे. या काळात गव्हाच्या पीकाची कापणी करण्यास सुरूवात होते. त्यामुळे देवाचे मनापासून आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने ओंबी समर्पित करण्यात येते.
शेणाच्या गव-या-अग्नि आणि इंद्र यांना वसंत पोर्णिमेचे देवता मानले गेले आहे. त्यामुळे गवऱ्या अग्निआभुषणाचे प्रतिक म्हणून अर्पित केल्या जातात.
नारळ – नारळाला धर्म ग्रंथांमध्ये श्रीफळ असे म्हटले गेले आहे. फळाच्या स्वरूपात यास अर्पण केले जाते. होळीसमोर अर्पण करून यास प्रसाद म्हणून सर्वांना दिले जाते
हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे.
हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य वा प्राण्याकडून, आणि अस्त्र वा शस्त्राने मृत्यु येणार नाही. त्यामूळे तो अतिशय गर्विष्ठ झालेला होता. पृथ्वीवर त्याने विष्णू देवाची पूजा करण्यास बंदी घातली होती. या हिरण्यकश्यपचा मुलगा होता प्रल्हाद. तो भगवान विष्णूंचा भक्त होता. तो सदैव देवाच्या नामस्मरणात मग्न असे, ही गोष्ट हिरण्यकश्यपला अजिबात आवडत नसे.
सुरूवातीला त्याने प्रल्हादाला रागावून पाहिले, मारून पाहिले पण प्रल्हादाने काही देवाचे नाव घेणे बंद केले नाही. प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या गेल्या पण दरवेळी देवाने त्याचे रक्षण केले. लोक त्याला ’भक्त प्रल्हाद’ म्हणत असत.
हिरण्यकश्यप राजाची एक बहिण होती तिचे नाव होते ’होलीका’. या होलीकेला एक वर मिळालेला होता, तो असा की तिला आगीपासून कुठलेही भय नाही. मग हिरण्यकश्यपू आणि होलिकाने असे ठरवले की ’होलीका’ प्रल्हादाला मांडीवर घेउन जळत्या आगीत बसेल आणि त्या आगीमधे ’भक्त प्रल्हाद’ जळून खाक होइल. पण याहीवेळेस भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय झाला आणि त्या आगीत ’होलीका’ जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला.
याच ’होलीका’ च्या नावावरून आजच्या दिवसाचे नाव आहे ’होळी’. या दिवशी संध्याकाळी जी आग पेटवली जाते त्यात सगळ्या वाईटाचा अंत होतो आणि जे जे पवित्र ते वाचते असे मानले जाते.
होळीशी संबंधित विविध कथा पुरातन ग्रंथांमध्ये आढळून येतात. या कथांमागे जीवनाचे सूत्र दडलेले आहेत. होळीशी संबंधित एक कथा पुढीलप्रमाणे आहे.
इंद्रदेवाला महादेवाची तपश्चर्या भंग करावयाची होती. त्यांनी कामदेवाला हे काम करण्यास सांगितेल. कामदेवाने त्यावेळी आपल्या माया शक्तीने वसंत प्रभाव निर्माण केला. या प्रभावाने सृष्टीवरील सर्व जीव काममोहित झाले. कामदेवाचा महादेवाची तपश्चर्या भंग करण्याचा हा प्रयत्न होळीपर्यंत चालू राहिला. होळीच्या दिवशी महादेवाची तपश्चर्या भंग झाली. क्रोधीत झालेल्या महादेवाने कामदेवाला भस्म केले आणि संदेश दिला की होळीच्या दिवशी (मोह, इच्छा, हाव, धन, मद) या गोष्टींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका.
तेव्हापासून होळीला वसंत व होळी उत्सवाची परंपरा सुरु झाली. या घटनेनंतर महादेवाने पार्वतीसोबत विवाह करण्याची सम्मती दिली. यामुळे सर्व देवी-देवता,शिवगण आनंदित झाले. या सर्वांनी एकमेकांवर गुलाल, रंग टाकून हा उत्सव स्वरुपात हा दिवस साजरा केला. जो आज धुलीवंदन स्वरुपात घराघरात साजरा केला जातो.
@ यशवंत नाईक