(पणजी)
गोव्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून पतीने पत्नीचा समुद्रात बुडवून संपवलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. अघोरी पद्धतीने आरोपीने पत्नीचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील एका आलिशान हॉटेलचा व्यवस्थापक गौरव कटियार (वय, 29) याला त्याची पत्नी दीक्षा गंगवार (वय, 27) हिला काबो-दे-रामा बीचवर बुडवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, कटियारने हत्येला अपघात म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना शुक्रवारी दुपारी दीक्षाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आला. प्रथमदर्शनी, गौरवने त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिची हत्या केली. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी दुपारी 3.45 च्या सुमारास ही घटना घडली. गौरव त्याच्या पत्नीला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला घेऊन गेला होता. तेथे गौरवने पत्नी दिक्षा हिला एका खडकाळ भागात नेऊन समुद्रात बुडवले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर गौरवने दु:ख झाल्याचा आव आणला आणि घटनेला अपघात म्हणण्याचा प्रयत्न केला. गौरवने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण एका स्थानिक व्यक्तीने शूट केलेल्या व्हिडिओ क्लिपने त्याचा पर्दाफाश केला.
आरोपीने सांगितले की, त्याची पत्नी लखनऊमध्ये राहत होती. तीही त्याच्यासोबत राहायला गोव्यात आली. मात्र, गोव्यात दीक्षाला तिच्या पतीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. गौरवने 19 जानेवारी रोजी दुचाकी बुक केली होती. दुपारी 3.35 च्या सुमारास ते पत्नीसह काबो डी रामा बीचवर गेले. तिथे दोघांनी काही वेळ खडकांवर घालवला. यानंतर ते पाण्यात गेले. यावेळी गौरवने पत्नीला समुद्रात बुडवले.
गोव्याच्या कुंकोलिमचे डेप्युटी एसपी संतोष देसाई यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या काही पर्यटकांनी या जोडप्याला पाण्यात शिरताना पाहिले होते. मात्र, गौरव एकटाच परत जाताना पाहून त्यांना संशय आला. काही लोकांनी त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. परतत असताना गौरवसोबत त्याची पत्नी नव्हती.
काही वेळाने दीक्षाचा मृतदेह पाण्यात तरंगताना पर्यटकांना दिसला. याबाबत कुंकोलीम पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रथम गौरवने हा अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हिडिओबाबत सांगितल्यावर त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.
महिलेच्या अंगावर गळा दाबून जखमा झाल्याच्या खुणा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंगावर गळा दाबून मारल्याच्या आणि इतर जखमा होत्या, त्यावरून हत्येपूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्याचा अंदाज होता. पोलिस आरोपींच्या कॉल डिटेल्सचीही चौकशी करत आहेत. आरोपीला शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीक्षाचे कुटुंबीय गोव्यात पोहोचल्यावर शवविच्छेदन केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.