( लखनौ )
आयपीएल 2023चा दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौने ५ विकेट्सनी विजय मिळवला. हैदराबादचा सलग दुसरा पराभव आहे. तर लखनौचा तीन सामन्यातील दुसरा विजय आहे.
कर्णधार बदलला आणि हैदराबादचा संघ तोंडावरच आपटल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कारण हैदराबाद संघाला लखनौविरुद्धच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाला फक्त १२१ धावाच करता आल्या. या आव्हानाचा लखनौने सहजपणे पाठलाग केला आणि हैदराबादला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात लखनौ संघाने बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली. या मोसमातील त्यांनी दुसरा विजय नोंदवला आहे. १२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघासाठी कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पंड्या यांनी फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावली. या मोसमातील सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये १२१ धावांचे आव्हान माफक समजले जाते. पण या माफक आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या संघाला तीन विकेट्स गमवाव्या लागल्या. हैदराबादने प्रथम काइल माइल्सला १३ धावांवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने आपल्याच चेंडूवर दीपक हुडाचा झेल पकडला. दीपकला यावेळी सात धावा करता आल्या. पण त्यानंतर कर्णधार लोकेश राहुल आणि कृणाल पांड्या यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. पण त्याचवेळी कृणाल बाद झाला. कृणालने २३ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या. शेवटी निकोलस पूरनने षटकार मारून सामना संपवला. त्याने १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नटराजनला षटकार ठोकला. सहा चेंडूत ११ धावा करून तो नाबाद राहिला. मार्कस स्टॉइनिसने १३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.
हैदराबादकडून आदिल रशीदने सर्वाधिक दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.