(मुंबई)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप, शिंदे गट यांचेवर जोरदार हल्लाबोल केला. रावणाने सन्याशाचा वेश घेऊन सीता पळवली तसे हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून आपली शिवसेना पळवायला निघालेत अशी असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला. स्वत:चे विचार नाहीत, म्हणून बाळासाहेबांचे फोटो लावताहेत, आनंद दिघे जाऊन 20 वर्षे झाली, आता दिघे आठवताहेत. कारण आता आनंद दिघे बोलायला नाहीत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ज्यांच्यावर जाबाबदारी दिली ते कटप्पा बनले. त्यांनी कट करून गद्दारी केली अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला.
एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली. ही बांडगुळं आपण आपल्या फांद्यांवर पोसत होतो. पण त्यांच्या लक्षात आलं नाही की बांडगुळांची मुळं फांद्यांमध्ये असतात, पण फांद्यांची मुळं जमीनीत असतात. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे. अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल
यांच्या घोषणांची अतीवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. म्हणून मला चिंता नाहीये. मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा मुलगा आहे. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालो आहे. आजही माझ्या हातात काहीच नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी हवी. जसं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
दुर्दैवाने त्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आपल्याकडून मी, सुभाष देसाई, आदित्य आणि अनिल परब हेच होते. ज्यावेळी नामकरणाचा ठराव आला, त्याच्या दुसऱ्याच क्षणाला काँग्रेस-राष्ट्रवादीनं हो म्हटलं आहे. मग काय आम्ही हिंदुत्व सोडलं? उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो. आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे.
माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते काँग्रेस बघा..काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे.. नीट लक्ष ठेवा हां… अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले… मग गद्दार कोण?
रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं… घेऊन जाणार कुठे?
बिल्किस बानो गुजरात दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला. आरोपी शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही, गावी गेल्यावर त्यांचा स्वागत सत्कार केला. या गोष्टी तुमच्या पक्षात घडत असतील, तर इतर लोक महिला शक्तीचा काय आदर राखणार?
आज मोहन भागवत म्हणाले स्त्रीशक्ती आणि पुरुष यांच्यात समानता असायला हवी. पण त्यांना मला विचारायचंय, महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये पवनी नावाच्या जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाच्या १९ वर्षांच्या मुलीचा खून झाला. तिथे एका रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपाच्या स्थानिक नेत्याचं आहे. हा महिलाशक्तीचा आदर.. तो हॉटेलमालक त्या अंकिताला येणाऱ्या-जाणाऱ्यांसोबत काही करण्यास सांगत होता. तिने नकार दिला. झाला तिचा खून. कुठे आहे महिला शक्तीचा आदर?
मोहन भागवत मध्ये मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितलं मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही. आता मुसलमानांनी सांगितलं की ते राष्ट्रपिता आहेत. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कशाशी जोडतात.
पुष्पा आला होता ना… झुकेगा नहीं साला… आणि हे म्हणतात उठेगा नहीं साला. एक बार झुकेगा तो उठेगाच नही… आता यांच्या सरकारला १०० दिवस होतायत. त्यातले ९० दिवस दिल्लीलाच गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ.
सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, की जेव्हा चलन घसरतं, तेव्हा त्या देशाची पत घसरत असते. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवा. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. मी आज त्यांना आव्हान देतोय की आम्हाला जमीन बघायचीच आहे. आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा. हिंमत असेल तर ती एक फूट जमीन जिंकून दाखवा. ती आमची मातृभूमीच आहे. ८ वर्ष झाली. मोदींच्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. पाकिस्तानको उनकी भाषा में उत्तर देना चाहिये… कोणती भाषा?
आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. पाकिस्तानच्या जीनाच्या कबरीवर यांच्या नेत्यांनी मस्तकं टेकवली. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलवता गेले आणि केक खाल्ला, हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? आजचा मेळावा हा विचारांचा मेळावा आहे असं ते म्हणाले.
शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर घणाघाती टीका केली. शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण आता त्यांच्या बुडाखाली जरी मंत्रिपदाच्या खुर्च्या चिकटल्या असतील तर त्या एक दिवस निघून जातील. मात्र कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केला.