निमित्त होते रत्नागिरी जिल्हा स्त्री व पुरुष अंध क्रिकेट संघ निवड चाचणीचे, आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरी संचलित, आस्था दिव्यांग कला क्रीडा व सांस्कृतिक केंद्र आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर येथे १८ वर्षावरील रत्नागिरी जिल्हा स्त्री व पुरुष अंध क्रिकेट संघासाठी खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमात आस्था च्या कार्याची माहिती, अंध क्रिकेटचे प्रयोजन आस्था च्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे यांनी सांगितले. तर सी. ए. बी. एम. चे अध्यक्ष श्री दादाभाऊ कुटे यांनी तळकोकणात अंध क्रिकेटची सुरुवात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व मंत्रीमहोदयांनी अंध दिव्यांग बांधवांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. आस्था च्या वतीने श्री. संकेत चाळके यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
मंत्री महोदयांनी मला अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी दिल्याबद्दल आस्थाचे आभार मानले व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष व राज्यमंत्री या नात्याने दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांना राजाश्रय देणे हे माझे कर्तव्य आहे अशी भावना व्यक्त केली. आपल्या भाषणात बोलतांना ते पुढे म्हणाले की दोन मिनिट डोळे बंद केले असता आजूबाजूला काय चालले आहे हे समजणे आपल्याला अशक्य होते, तर अंध दिव्यांग बांधव आपले आयुष्य कसे जगत असतील? आणि आज क्रिकेट कसे खेळतील? याचा अनुभव घेण्यासाठी नामदार मंत्रीमहोदयांनी स्वतः डोळयांवर पट्टी बांधून 2-3 चेंडू खेळण्याचा अनुभव घेतला व निवड चाचणी चे उदघाट्न झाल्याचे जाहीर केले.
सर्व दिव्यांग खेळाडूंना आवश्यक तो पाठिंबा देण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड चे अध्यक्ष श्री. दादाभाऊ कुटे, सचिव श्री. रमाकांत साटम, प्रशिक्षक अजय मुनी यांनी अंध क्रिकेट चे बेसिक प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक करायला लावुन खेळाडूंची रत्नागिरी संघासाठी निवड केली.
या निवड चाचणीत २८ पुरुष व ११ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या कार्यकमाला रत्नागिरी शहराचे नगराध्यक्ष श्री प्रदीप उर्फ बंड्या शेठ साळवी, श्री राजन शेटे, श्री. बाबू म्हाप, श्री बिपिन बंदरकर, श्री जैन., ला. डॉ.शेखर कोवळे, लायन्स चॅरेटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष, ला.सुनीलदत्त देसाई, जिल्हा नियोजनचे श्री. वंजारे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. बोरवडेकर, रत्नागिरी न. प. चे अतिरिक्त मुख्याधिकारी उपस्थित होते. अल्पोपहाराची व्यवस्था श्री. रुपेश पाटील व दुपारच्या जेवणाची व्यवस्था लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आली होती.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्थाच्या श्री. संकेत चाळके, श्रीम. संपदा कांबळे, श्री.कल्पेश साखरकर, श्रीम. अनुष्का आग्रे, श्रीम. शिल्पा गोठणकर, श्री. पुनीत करंजवकर, श्री. प्रथमेश घोसाळकर, श्री. साहिल खानविलकर, श्री. पारस जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.