(मुंबई)
मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली होती. याप्रकरणाची या महिलेने फेसबुक पोस्टद्वारे आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीत प्रवेश नसल्याची मुजोरीची भाषा सोसायटीच्या सेक्रेटरीने केल्याचे सांगितले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. मनसे या महिलेच्या मदतीला धावून येत मनसे स्टाईलने सेक्रेटरीला जाब विचारला.
या घटनेनंतर सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या मराठी लोकांना टोला लगावला आहे. “मराठी महिलेला घर नाकारले म्हणून गुजराथी लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.मारवाडी जैन गुजराथी हाउसींग सोसायटी मधे मराठी लोकांना खालच्या दर्जाचे,मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत. मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे. मुलूंड मधील घटनेनंतर गुजराथी लोकांना हाकलून लावा अशा कमेंटचा पाऊस न्युजखाली पडला.”
पुढे आव्हाड म्हणाले की, “हेच मराठी लोक जात पाहून शेडुल्ड कास्ट लोकांना घरे नाकारतात. धर्म पाहून मुसलमानांना घर नाकारतात. शेरास सव्वाशेर गुजराथी मारवाडी जैन हे मराठी लोकांना जेव्हा लात घालतो तेव्हा हे किंचाळतात. कटू पण सत्य आहे.” दरम्यान, या घटेनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे. “कुणाची अशी मक्तेदारी चालू देणार नाही. असा प्रकार महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेऊ. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचं धाडस होणार नाही अशी भूमिका घेऊ. महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. नेमकं तिथं काय झालं याची माहिती घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल”, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.
मराठी महिलेला घर नाकारल म्हणून गुजराथी लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मारवाडी जैन गुजराथी हाउसींग सोसायटी मधे मराठी लोकांना खालच्या दर्जाचे,मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत.मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे.
मुलूंड मधील घटनेनंतर गुजराथी लोकांना हाकलून लावा अशा कमेंटचा पाऊस…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2023
काय आहे प्रकरण
मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही, असे सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितले. मात्र याबाबत तृप्ती यांना जाब विचारला. मात्र त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करण्यात आली. या घटनेनंतर या महिलेने फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता.