(गुहागर)
गुहागर तालुक्यात ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिले वसुलीचा एकमार्गी धडाका लावण्यात आला होता. या कामी महावितरणचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित केले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही घरोघरी जाऊन ग्राहकांना वीजबिले भरण्यास प्रवृत्त केले. यासाठी गावोगावी फिरून ध्वनिक्षेपकावरून वीजबिल भरण्यासंदर्भात लोक जागृती केली होती. या कामी गुहागर तालुक्यातील ग्राहकांनाही महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपली बिले भरली. त्यामुळे महावितरणच्या गुहागर विभागाची वसुली जवळपास सुमारे २ कोटी २४ लाख १३ हजार इतकी झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने संपूर्ण मार्च महिना ग्राहकांकडची थकीत वीजबिले वसूल करण्याच्या लावलेल्या सपाट्याला यश आले असून जवळपास ९८ टक्के एवढी वसुली गुहागर विभागाने केली आहे.
गुहागर तालुक्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून सुमारे २ कोटी ३२ लाख वसुलीचे ध्येय दिले होते. मात्र गुहागर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास सुमारे २ कोटी २४ लाख १३ हजार एवढी वसुली केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुकही होत आहे. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ९८ टक्के वसुली केली आहे.
गुहागर विभागाच्या महावितरण कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातून तसेच तालुक्याच्या बाजारपेठांमधून ग्राहकांना भेटून त्यांना योग्यरीतीने समजावून आपल्या वसुलीचे ध्येय पूर्ण केले.
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचे श्रेय : अशोक मोहिते (उप व्यवस्थापक)
वसुलीसाठी प्रत्येक फिडरमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी माझ्या शब्दाचे पालन करून ग्राहकांना योग्यरीत्या समजावून वसुली केली आहे. हे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे. यासाठी जनजागृती रॅलीही काढण्यात आली. वसुली मोहिमेमधून अनेक गावे “निरंक” करून जिल्ह्यापुढे एक आदर्श ठेवला. या कामी मला श्री. गणेश गलांडे ( उपकार्यकारी अभियंता ) अल्लवीन फर्नांडीस ( कनिष्ट अभियंता ) सुनील कोठावळे, सनी पवार, रोहित दाबेराव, बसवराज कलशेट्टी, जयश्री माळकर, राहुल निमकर (शाखा अभियंता ) यांचे चांगल्याप्रकारे सहाय्य लाभले. यांच्यामुळेच गुहागरची वसुली ९८ टक्केपर्यंत पोहोचली.