(मुंबई)
श्रद्धा वालकर हत्याकांडापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी व आमदारांनी लव्ह जिहाद मुद्यावर आक्रमक भूमिका घेत लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सरकारकडून लव्ह जिहादविरोधात विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशन गाजणार असून वादळी होण्याची चिन्हे आहेत.
कोरोना महामारीनंतर तीन वर्षांनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत मोर्चे व आंदोलने करणे थोडे कठीण असल्याने नागपूर अधिवेशनात अनेक संघटनांकडून विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले जातात. यामुळे हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच अधिवेशनात सत्ताधारी पक्षाने लव्ह जिहादविरोधी विधेयक सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात हे विधेयक चर्चेसाठी येण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातही लव्ह जिहादच्या काही घटना घडल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीमध्ये तिचा लिव्ह इनमधील पार्टनर आफताब याने केलेल्या हत्येनंतर या मुद्द्यावर गरमागरम चर्चा होत आहे. तसेच श्रद्धा वालकर हिची हत्या हा लव्ह जिहाद चा प्रकार असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. त्यातच श्रद्धा वालकरच्या वडिलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोपी आफताला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच त्याच्या आरोपीच्या कुटूंबाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी लव्ह जिहादविरोधात विधेयक आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मांडले गेल्यास हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच या विधेयकाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे आहे.