(पुणे)
राज्यातील एसटी महामंडळाच्या गुलाबी रंगाच्या २०० निमआराम ‘हिरकणी’ एसटीला नवा साज चढविला जाणार आहे. हिरकणी बसबांधणीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, यातील १२० बस पुण्यातील दापोडी कार्यशाळेत बांधण्यात येत आहेत,अशी माहिती दापोडी कार्यशाळेचे व्यवस्थापक डी.जी.चिकोर्डे यांनी दिली.
पुण्यासह नागपूर कार्यशाळेत ३० आणि संभाजीनगर कार्यशाळेत ५० बसबांधणीचे काम सुरू आहे. एकेकाळी एसटी गाड्यांची अवस्था मरणासन्न झाली होती.त्यात प्रवासी बसेनासे झाले होते.मात्र, आता पुण्यातील पीएमपीएमएल आणि मुंबईतील बीआरटीप्रमाणे एसटी महामंडळाच्या बस देखील कात टाकत आहेत. एसटीच्या ताफ्यात नुकत्याच इलेक्ट्रिक शिवशाही, इलेक्ट्रिक शिवनेरी आणि नव्या लालपरी बस दाखल होत आहेत. त्यांच्यासोबतच आता नव्या रूपातील या गुलाबी/हिरव्या रंगाच्या हिरकणी बस दाखल होणार आहेत. या नव्या बसमधील पुणे विभागाला ७० बस मिळणार आहेत. उर्वरित १३० बसचे राज्यभरातील एसटी डेपोंना वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नव्या हिरकणी निमआराम बसमध्ये बसून प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे,असेही चिकोर्डे यांनी सांगितले.