कर्नाटकातील हिजाब विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी (दि. २९) सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिजाबसंदर्भात एकूण चोवीस याचिका दाखल असून त्यावर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ठरवून दिलेला गणवेश परिधान करणे गरजेचे असून अशा ठिकाणी हिजाब अथवा अन्य धार्मिक परिधानाला परवानगी देता येणार नाही, असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.
याबाबतच्या याचिका गेल्या मार्च महिन्यात दाखल झालेल्या होत्या. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने राज्य सरकारचा शाळा-महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करण्याचा आदेश योग्य असल्याचे म्हटले होते.