( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरीत 4 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करत अशा नोटीसीना आपण घाबरत नसून हिंमत असेल तर तुरुंगात टाका. अशा अनेक केसेस आम्ही झेलल्या आहेत. तुम्ही कितीही षडयंत्र रचा, तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे सोबतच राहणार असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले, मी निष्ठावंत आहे. आणि निष्ठावंत राहणार. ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या देण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले. आपण एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आमदार साळवी यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या यावर बोलताना म्हणाले, तुरुंगात गेलो तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार आहे. मला स्वकीयांचा, पक्षातील कोणत्याही व्यक्तीचा त्रास नाही. उद्धव ठाकरे यांनी आपण पाठिशी असल्याचे आश्वासन दिले असल्याचे साळवी यांनी म्हटले.
मला 15 दिवसांची मुदत द्या अशी मागणी एसीबीकडे केली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, चौकशीसाठी अलिबाग येथे सोमवारी, 4 डिसेंबर रोजी बोलावले आहे. या दरम्यान, एसीबीने मला अटक केली तरी चालेल असेही त्यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन, पण कुठही जाणार नाही, असेही साळवी म्हणाले.