(लंडन)
चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ असलेले आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे बुधवारी लंडनमध्ये निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदुजा यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली. एस. पी. हिंदुजा यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीचंद पी. हिंदुजा किंवा एस.पी. म्हणून ते ओळखले जात होते. 50 च्या दशकाच्या सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले होते. त्यांच्या पश्चात गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा हे त्यांचे तीन भाऊ आहेत, यासोबतच दोन मुली शानू आणि विनू असा त्यांचा परिवार आहे.
आरोग्यसेवा, बँकिंग आणि रसायने या क्षेत्रांमध्ये हिंदुजा कुटुंबाचा व्यवसाय पसरलेला आहे. जगभरातील सुमारे 2 लाख लोकांना हिंदुजा कंपनी रोजगार देते, त्यांच्या अफाट संपत्तीने श्रीचंद, गोपीचंद यांच्यासह संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला 2022 च्या ‘द संडे टाइम्स यूके’च्या श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थान मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 28 अब्ज पौंड ($33 अब्ज) आहे.