(नवी दिल्ली)
मागील दोन वर्षांत म्हणजेच कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर अगदी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांचा हार्टअटॅकमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आता अशा मृत्यूंचा कोरोनाशी संबंध असल्याचा निष्कर्ष आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या काढला आहे. या संशोधनाचा अंतिम अहवाल पुढील दोन आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.
कोरोनानंतर हार्टअटॅकमुळे होणार्या मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले होते. त्यानुसार आयसीएमआरच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केले होते. याच अभ्यासातून या मृत्युंशी कोरोनाचा संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनाची दीर्घकाळ लागण किंवा कोरोनावरील लशीमुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता अधिक असल्याची या संशोधकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, हा अभ्यास करताना हार्टअटॅकने मृत्यू झालेल्या तरुणाला दीर्घकाळ कोरोनाची लागण झाली होती का, तसेच त्याने कोरोनाची लस घेतली होती का, या बाबींचा अभ्यास करण्यात आला होता. यासाठी ४० वेगवेगळ्या रुग्णालयांतील रुग्णांचे अहवाल तपासण्यात आले. तसेच आकस्मिक मृत्यू, हार्ट अटॅकने मृत्यू आणि ब्रेन स्ट्रोकने अशा तीन पातळीवर हा अभ्यास करण्यात आला होता. चौथ्या स्तरातील अभ्यास हा हार्टअटॅक येऊनही मृत्यू न झालेल्या रुग्णांच्या अहवालावर आधारित होता.
कोरोना आणि हृदयाशी संबंधित आजार
साथीच्या सुरुवातीच्या काळात लोकांच्या आरोग्यासंबंधीचा बराच डेटा गोळा करण्यात आला होता. यात असं दिसून आलं की, कोरोनाचा संसर्ग झाल्यावर लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. यात हार्ट फेल्युअर, मायोकार्डियल डॅमेज, अॅरिथमिया आणि अॅक्युट कोरोनरी सिंड्रोम यांसारखे आजार वाढल्याचं दिसलं. कोरोना संसर्गामुळे हार्ट अटॅकच्या शक्यता वाढल्या आहेत. यामागे दोन शक्यता देण्यात आल्या आणि यासाठी काही पुरावे देण्यात आले.
जेव्हा एखादा व्यक्ती कोरोनाने संक्रमित होतो तेव्हा त्याचं शरीर या विषाणूला रिअॅक्ट करतं. यात त्या व्यक्तीच्या हृदयाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. यात रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. कारण रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी जागाच उरत नाही. याला व्हॅस्क्युलर इंफ्लेमेशन म्हणतात.
त्यात ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांची परिस्थिती आणखीनच अवघड होते. एसीई-2 या प्रोटीनचा वापर करून कोरोना विषाणू माणसांच्या शरीरात प्रवेश करतो. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या एंडोथेलियल पेशींमध्ये या प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. हे प्रोटीन हृदय नीट सुरू राहावं यासाठी, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोलाइट कंट्रोल आणि मज्जातंतूंच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतं. मात्र वॅक्सीनमुळे रक्तवाहिन्यांची हानी होत असल्याचे दावे करण्यात आले असले तरी वैज्ञानिक डेटा या दाव्यांचं समर्थन करताना दिसत नाही.
गर्भपाताची प्रकरणं वाढली
कोरोना विषाणू थेट एंडोथेलियमवर अटॅक करत असल्याने प्लासेंटाला सुद्धा हानी पोहोचते आणि गर्भपात होतो. म्हणजे गर्भवती माता आणि अर्भक यांच्यात जी नाळ असते त्याचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना कोरोना विषाणूचं संक्रमण झाल्यावर त्यांचं ब्लड प्रेशर असंतुलित होतं आणि गर्भपात होण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त इतरही अनेक अभ्यास झाले. यात असं म्हटलंय की, जर महिला कमी महिन्यांची गरोदर असेल आणि तिला कोरोनाची लागण झाली तर भ्रूणाच्या अवयवांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.