( खेड / इक्बाल जमादार )
पुणे – नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्याच्याजवळ एक धडकी भरवणारी घटना घडली. महामार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या लाल परीची मागची दोन्ही चाकं निखळल्यामुळे मोठी खळबळ उडाली. चाकं निखळ्यानंतर एक चाक बसच्या पुढे आणि दुसरं चाकं रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात जाऊन पडलं. चाकं नसतानाही ही बस जवळपास १५ ते २० मिनिटे दोन चाकांवर धावत असल्याची माहिती समोर आली आहे.
बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. मात्र, ऐनवेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील ३५ प्रवासी सुखरुप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावर ‘एस टी’ची मागची दोन्ही चाके अचानक निखळली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. जवळपास १५ ते २० सेकंद ही बस रस्त्यावर धावली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडलं. बस तिरकी होऊन रस्त्यावरच धावत होती. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरड सुरू झाला. परळ डेपोची बस क्रमांक एमएच १२ बीएल ३६१८ ही बस परळवरुन नारायणगावकडे निघाली होती.
आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत बसची दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस चारच चाकांवर घासत पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
बस घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. मात्र, हा प्रकार चालकाच्या वेळीच लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.