हवामान बदल व अवकाळी पावसामुळे या वर्षी कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन कमी झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारातील हापूस हंगामही आता संपण्याच्या मार्गावर आहे. हापूसची आवक कमी होत असून मे अखेपर्यंतच आवक होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी करोनामुळे हापूसच्या विक्रीवर परिणाम झाला होता. थेट विक्रीतून हापूस बागयतदारांनी काहीसा सावरण्याचा प्रयत्न केला होता. या वर्षी तरी एपीएमसीच्या बाजारात हापूस आवक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र फळधारणेच्या काळातच वातावरण बदल व अवकाळी पावसामुळे या वर्षी हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी झाले याचा परिणाम एपीएमसीतील हापूसच्या आवकीवरही झाला.*
पीएमसी बाजारात १५ मार्चनंतर हापूसची आवक वाढण्यास सुरुवात होत असते. मात्र या वर्षी हापूसची आवक कधी कमी तर कधी जास्त होत राहिली. हंगामात सातत्य राहिले नाही. दरवर्षी या महिन्यात हापूसच्या ४० ते ५० हजार पेटय़ा आवक होत असते. आता ३० ते ३५ हजार पेटय़ा आवक होत आहे. ही आवक यापुढे वाढण्याची शक्यता नाही. २० ते २२ मे पर्यंत हापूसचा हंगाम सुरू राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या बाजारात तयार हापूस येत आहेत. त्यामुळे ४ ते ६ डझनला १५०० ते ३००० रुपये पर्यंत बाजारभाव आहेत. तर कर्नाटक आंब्याची ३० ते ४० हजार पेटय़ा आवक असून प्रतिकिलो ५० ते १०० रुपये दर आहेत. हापूसचा हंगाम संपताच बाजारात २० मे पासून गुजरात येथील आंब्याची आवक सुरू होईल तर २० ते २५ जूनपासून जुन्नर आंब्याचीही आवक सुरू होणार आहे.*