(रत्नागिरी)
शिडीच्या सहाय्याने नारळ झाडावर पुरुष आणि स्त्री गट आणि झाप विणणे या स्पर्धांचे आयोजन हातिसमध्ये करण्यात आले होते. हातिस गावात भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी लावलेल्या कल्पवृक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धा नुकत्याच झाल्या.
हातिस ग्राम विकास मंडळ (हातिस आणि मुंबई) आणि स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने आणि शिडीच्या सहाय्याने माडावर चढण्याच्या स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये संजय शंकर आंबेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पारंपरिक पद्धतीने गटामधून द्वितीय क्रमांक दीपक ज्ञानेश्वर आंबुलकर (हातिस) यांना मिळाला. शिडीच्या सहाय्याने पुरुष गटात प्रथम क्रमांक संजय शंकर आंबेकर तर द्वितीय क्रमांक उत्तम प्रकाश कालकर यांनी तर तृतीय क्रमांक नीलेश हिरोजी पुसाळकर यांनी पटकाविला. शिडीच्या सहाय्याने स्त्री गटात फक्त सौ. प्रियांका समिल नागवेकर यांनी यशस्वीपणे शिडीच्या झाडावर चढून प्रथम क्रमांक मिळविला. प्रथम विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय ७५० आणि तृतीय क्रमांकाला ५०१ रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
परीक्षक म्हणून संशोधन अधिकारी डॉ. सुनिल घवाळी, स्वराज्य ग्रुपचे तुषार आग्रे व चंद्रकांत राऊत आणि श्री. कांबळी यांनी काम पाहिले. यासाठी हातिस ग्राम विकास मंडळ हातिस आणि मुंबई आणि ग्रामस्थानी अथक परिश्रम घेतले होते. सोमेश्वर सरपंच नाझिया मुकादम, माजी जि. प. सदस्य महेंद्र झापडेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
झाप विणणे स्पर्धेत रश्मी पुसाळकर प्रथम
पीर बाबरशेख मंदिराचे परिसरात नारळाचे झाप विणणे स्पर्धेत रश्मी पुसाळकर यांनी ११ मिनिटात झाप विणून प्रथम क्रमांक पटकविला. दुसरा क्रमांक १२.३० मिनिटात झाप विणून विठोबा नागवेकर यांनी, तृतीय क्रमांक सौ. आरती नागवेकर (१६ मिनीटे) यांना उत्तेजनार्थ बक्षीस वनिता भास्कर भोवड (१८ मिनिटे) यांना मिळाला. झाप विणणे हे कसब हळूहळू लोप पावत आहे, त्याला पुन्हा उर्जितावस्था यावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम क्रमांकाला एक हजार रुपये, द्वितीय ७५०, तृतीय ५०० आणि उत्तेजनार्थ क्रमाकाला २५० रुपये बक्षीस आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून संशोधन अधिकारी डॉ. सुनिल घवाळी, स्वराज्य अॅग्रो ग्रुप संस्थापक अध्यक्ष तुषार आग्रे आणि कृषी विभागाचे श्री. कांबळी यांनी केले. आयोजनात विशेष सहभाग दीपक आंबुलकर यांचा होता.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, कुमार शेटये, महेंद्र झापडेकर, महेंद्र झापडेकर, मरिनर दिलीप भाटकर, गनीभाई बंद्री, डॉ. दिलीप नागवेकर, सरपंच सौ. कांचन नागवेकर, भारती पिलणकर, स्वाती फुटक, नाझीया मुकादम, श्रीमती रहाटे, शंतनू नागवेकर, दिवाकर नागवेकर, उत्तम नागवेकर, विजय नागवेकर, जयवंत नागवेकर आदी उपस्थित होते