(रत्नागिरी)
राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज ) ग्रामीण युनिटचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हातखंबा नागपूर पेठ येथे गोवा बनावटीचे मद्य वाहतूक करणारा ट्रक पकडला. ट्रकमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे ३२ बॉक्स आढळून आले आहेत. सुमारे ४ लाख रुपये इतकी या मद्याची किंमत असून मद्यासह ट्रकही (एमएच ०६ बीडब्ल्यू ६३५२ ) जप्त करण्यात आला आहे. ट्रकचालकाला अटक करण्यात आले असून, रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ट्रकसह २४ लाख ४७ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी याच दुय्यम निरीक्षकांनी अशीच मोठी कारवाई केली होती.
शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होण्याची शक्यता ओळखून ग्रामीण युनिटचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी आपल्या पथकासह गस्त सुरु ठेवली होती. संशयित वाहनांची तपासणी करत असताना पहाटेच्यावेळी आलेला आयशर ट्रक थांबवण्यात आला. ट्रकच्या हौद्यात सिमेंट बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्कोफाईन पावडरच्या गोणी होत्या. या पावडर गोण्यांच्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे लपवून ठेवलेले बॉक्स शोधून काढण्यात आले. विदेशी मद्याचे ३२ बॉक्स असून त्याची सुमारे ४ लाख ४७ हजार रुपये इतकी किंमत आहे.
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला असून त्याची किंमत २० लाख रुपये इतकी आहे. ट्रकचालक रोहित रामनाथ घरत (वय २८, रा. जोहे, जि. रायगड) याला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सागर धोमकर, ग्रामीण युनिटचे निरीक्षक बापूसाहेब डोणे यांच्या मार्गदर्शनानुसार दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. वर्षभरापूर्वी हातखंबा येथील एका ढाब्याजवळ अशीच मोठी कारवाई भगत यांनी केली होती. यावेळी सुमारे २५ लाख रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले होते.