(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा चेकपोस्ट नजिक रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. महामार्गाचे चौपदरीकणाच्या काम चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे हातखंबा चेकपोस्ट जवळील रस्ता म्हणजे या मार्गावरील वाहन चालकांसाठी चांगलाच डोकेदुखीचा ठरत आहे. रस्त्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हे कळण्यास मार्ग नाही.
मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा-पाली रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याच्या संथ कामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे ,चिखलाच्या साम्राज्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पाली ते हातखंबा १३ किमीचा रस्ता पार करण्यासाठी पंधरा मिनिटा ऐवजी तासभर लागत आहे. १३ किमीचे अंतर म्हणजे वाहन चालकांसाठी वेदना देणारे ठरत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या मार्गाने नेत असतांना तो रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहचेल किंवा नाही याबाबत शंकाच आहे.
बावनदी ते वाकेड या भागातील चौपदरीकरणाची एक लेन मे महिन्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र लेन पूर्ण होणे दूरच…ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्या मोऱ्यांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. या क्षेत्रातील काम हन इन्फ्रा सोल्यूसन प्रायव्हेट लि. कंपनी मार्फत करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी या रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याला एक वर्षाचा कालावधी लोटूनही सदर रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे अनेक अपघातही झाले आहे. कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या नियोजनाअभावी केवळ काही भागातील रस्ता तो ही एकाच बाजूने तुकड्या-तुकड्यात पूर्ण झाला आहे.
पालकमंत्री महोदयांचे सुध्दा दुर्लक्ष
विशेष म्हणजे रस्ता बांधकाम करतांना कंत्राटदाराने पावसाळ्याच्या तोंडावर सर्व्हिस रोड सुस्थितीत करणे गरजेचे होते. नियोजनबध्द काम न करता संपूर्ण रस्ताच्या बाजूला असणाऱ्या मातीने रस्त्या चिखलमय झाला आहे त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराच्या नियोजनाअभावी आजघडीला पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावर ये-जा करतांना प्रथम चिखलाचा सामना करावा लागतो. या चिखलामुळे दुचाकीस्वार घसरुन अपघात होण्याची भीती आहे. तर रस्त्यावरचा चिखल वाहनचालक आणि पायी चालणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर उडत असल्याने त्यांना आपल्यासोबत एक ड्रेस ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र याबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही घेणे देणे नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे याच मार्गाने पालकमंत्री महोदय सुध्दा जातात. मात्र त्यांचे सुध्दा या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने वाहनचालकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उन्हाळयात धूळ, पावसाळ्यात चिखल
एक वर्षापासून या भागातील चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. उन्हाळ्यात या रस्त्यावर ये-जा करतांना वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागत होता. आता वाहन चालकाचे कपड्याचे कलरच बदलून जातायत. उडणाऱ्या धुळीमुळे काही अपघात सुध्दा घडले आहे. तर पावसाळ्यात चिखल अंगावर उडत आहे. एकीकडे धुळ आणि दुसरीकडे चिखल असे दुहेरी संकट गेल्या एक वर्षापासून वाहनचालक आणि सोसावे लागत आहे.