(रत्नागिरी)
गेल्या दोन महिन्यांनापासून मिऱ्या-नागपुर महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गामुळे ठिकठिकाणी सर्व्हिस रोड खोदाई करून भुयारी गटारांची कामे केली जात आहेत. सर्व्हिस रोडवर खोदकाम करून बुजवण्याकरीता भराव टाकल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अंदाधुंद कारभारामुळे वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले आहेत.
महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्याकरिता भुयारी गटारांची कामे सुरू आहेत. हातखंबा भागात सध्याचा सर्व्हिस रोडवर दोन ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोदून त्यावर भराव टाकण्यात आला आहे. हा भराव कोणता? तर एखाद्या दुसऱ्या ठिकाणचे डांबराच्या रस्त्याचा थर उखडून भराव म्हणून टाकला जात आहे. खोदाई केलेल्या ठिकाणी भराव टाकल्यावर त्यावर रोलर फिरवून सपाटीकरण करणे आवश्यक असते. मात्र तसे न करता मोठ्या दगडीसह भराव टाकला जात आहे. या धोकादायक स्थितीतून वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
महामार्गाच्या कामामुळे वाहनचालकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची जबाबदारी संबधित ठेकेदार कंपनीची आहे. तसेच महामार्ग प्राधिकरण विभागाची देखील आहे. भराव टाकलेल्या ठिकाणी रोलर न फिरवल्याने रोड धोकादायक झाला आहे. आपले काम सोपे कसे होईल हे ठेकेदाराकडून पाहिले जात आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
एसटी, ट्रक सारख्या मोठ्या गाड्या भरधाव वेगाने मार्गक्रमण करत असतात. गाडीचा वेग कमी करण्याच्या नादात पुढील वाहनास जोरदार धडक बसून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.