(नवी दिल्ली)
हवाई दलाने कंत्राटी सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत भरतीला गती दिली आहे. ‘अग्निवीरां’ च्या तीन हजार पदांसाठी साडेसात लाखांवर उमेदवारी अर्ज आले आहेत. या योजनेच्या चार वर्षांत ‘अग्निवीरां’ची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी १३ पथके सांभाळणार आहेत. हवाई दलप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी रविवारी ही माहिती दिली.
‘अग्निपथ’ योजना सर्वोत्तम मनुष्यबळासह भक्कम व भेदक दल बनण्याच्या हवाई दलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला अनुरूप आहे. नवीन भरती प्रक्रिया या दलाची कार्यक्षमता कमी करणार नाही. ही योजना तरुणांना प्रचंड अनुभवासह सशस्त्र दलांत सेवेसाठी सज्ज करेल. तसेच राष्ट्रीय सुरक्षेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हवाई दलाला सक्षम बनवेल, असा दावा हवाई दलप्रमुख चौधरी यांनी केला आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे हवाई योद्ध्याकडून असलेल्या मूलभूत अपेक्षांमध्ये गुणात्मक बदल दिसून आला आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने १४ जूनला जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात चार वर्षांसाठी १७ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांची भरती केली जात आहे. यातील २५ टक्के तरुणांना १५ वर्षे सेवा करता येणार आहे. यंदाच्या भरतीत कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्यात आली आहे.