(संगमेश्वर / प्रतिनिधी )
मराठी भाषेचे प्रादेशिक महत्त्व हळव्या कोपऱ्यातून वाचकांच्या समोर येईल. कोकणातील छोट्या छोट्या प्रसंगांचे येथील माणसांचे समयोचित आणि सुंदर वर्णन या पुस्तकातून केले गेले आहे. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हळवा कोपरा या पुस्तकाचे प्रकाशन झाले, ही लेखकाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रख्यात लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी चपराक प्रकाशनच्या ग्रंथ दालनात कोकणातील संगमेश्वरचे लेखक जे.डी.पराडकर यांचे हळवा कोपरा हे सातवे पुस्तक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नाशिक येथील प्रख्यात लेखक ऐश्वर्या पाटेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी नाशिक येथील पुस्तकांच्या हॉटेलचे संचालक प्रवीण जोंधळे, कथाकार सप्तर्षी माळी, चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील, शिक्षण तज्ञ लेखक संदीप वाकचौरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना ऐश्वर्या पाटेकर पुढे म्हणाले की, वाचकांचा हळवा कोपरा या पुस्तकाला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल, असे सुंदर ललित लेख या पुस्तकांमध्ये समाविष्ट केले आहेत. केवळ कोकणातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील आणि सर्व मराठी वाचकांनी आवर्जून हे पुस्तक मागवावे, असे आवाहन पाटेकर यांनी केले.
हळवा कोपरा या पुस्तकामध्ये विविध ललित लेखांचा समावेश असून यामध्ये कोकणच्या विविध प्रथा – परंपरा, कोकणची माणसं यांचे दर्शन आपल्याला होते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सावर्डे येथील चित्रकार अमेय कोलते यांनी केले आहे. पुस्तकाची पाठराखण संगमेश्वर येथील गायिका आणि निवेदिका दीप्ती गद्रे यांनी केली आहे. हळवा कोपरा हे पुस्तक मागवण्यासाठी चपराक प्रकाशन, पुणे ७०५७२९२०९२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हळवा कोपरा पुस्तक विक्रम करेल – घनश्याम पाटील
कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी.पराडकर यांचे चपराक प्रकाशनने हळवा कोपरा हे सलग सातवे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील सर्वच ललित लेख वाचनीय असून मराठी साहित्यात हे पुस्तक विक्रम करेल,असा विश्वास संपादक घनश्याम पाटील यांनी व्यक्त केला. जे.डी.पराडकर यांनी चपराकने प्रकाशित केलेल्या सातही पुस्तकात कोकणच्या प्रथा – परंपरा, कोकणची माणसे, येथील संस्कृती, परंपरा, पर्यावरण यावरून भरभरून लिहिले आहे. या सर्व पुस्तकातून त्यानी संपूर्ण कोकण उभे केले आहे. हळवा कोपरा पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील अप्रतिम झाले आहे.
फोटो : चपराक प्रकाशित हळवा कोपरा हे जे. डी. पराडकर यांचे पुस्तक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ऐश्वर्य पाटेकर, संपादक घनश्याम पाटील, लेखक जे. डी.पराडकर , कथाकार सप्तर्षी माळी, प्रवीण जोंधळे, लेखक संदीप वाकचौरे