( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. रत्नागिरी येथे गोकुळ जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री सामंत यांनी शिवसेनेला इशारा दिला. ज्या ठिकाणी (पुणे शहरातील कात्रज चौकात सामंत यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.) उदय सामंतवर हल्ला झाला, त्याच ठिकाणी पुढच्या १५ दिवसांत मी एकटा जाऊन सभा घेणार आहे. कुणाच्यात दम आहे, त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं, असे खुले आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला दिले आहे.
ते म्हणाले की, मी १९९९ पासून राजकारणात रत्नागिरीमधील जनतेच्या आधारावर आणि आशीर्वादावर काम करत आहे. दुःख फक्त एवढंच वाटलं की, माझ्यावर अनेकदा टीका झाली. पण मी कुणालाच भीक घातली नाही. माझ्यावर हल्ला झाला. टीव्हीवर फक्त तीन मिनिटांचीच क्लिप दाखवली. पण ती सात मिनिटांची क्लिप आहे. मला विश्वास होता की, भैरीदेवाचा आशीर्वाद आणि रत्नागिरीची जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत माझ्या केसालादेखील धक्का लागणार नाही. म्हणून या रत्नागिरीच्या जनतेच्या साक्षीने सांगतो की, ज्या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला. त्याच ठिकाणी पुढच्या १५ दिवसांत मी एकटा जाऊन सभा घेणार आहे. कुणाच्यात दम आहे, त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं. असे ही सामंत यांनी सांगितले.