(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी चिंचवाडी वणवा लागल्यामुळे आंबा, काजूची दिडशे झाडे जळून खाक झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवली. यामध्ये सुमारे 11 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा प्रकार 3 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.
कडकडीत उन्हामुळे डोंगराळ भागातील गवत पूर्णतः सुकलेले आहे. त्यामध्ये चुकून आगीची ठिणगी पडली की लगेचच त्याचे रुपांतर वणव्यात होते. असाच प्रकार चिंचवाडी येेथे मंगळवारी घडला. सायंकाळच्या सुमारास प्रशांत दत्तात्रय शेरे (52, रा. चांदेराई) यांच्या चिंचवाडीतील आंबा कलमांच्या बागेजवळ आग लागली होती. तीचे रुपांतर वणव्यात झाले. उन्हामुळे सुकलेली झाडांची पाने वेगाने आगीत भस्मसात होत होती.
शेरे यांच्या आंबा बागेशेजारी चांदेराईतील शेतकरी लिंगायत यांची काजूची बाग आहे. तिथेही वणवा पोचला. आगीचे लोट पाहिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. अर्धा अधिक गाव तिथे गोळा झाला होता. जवळच्या नदीपात्रातील पाणी आग विझवण्यासाठी वापरण्यात आले. सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली होती; परंतु तोपर्यंत आंबा, काजूची सुमारे दिडशे कलमे आगीमध्ये खाक झाली.
हंगाम उशिरा असल्यामुळे आंबा बागेत फळ लागलेली होती. तीही आगीमध्ये भस्मसात झाली. यामुळे दोन्ही बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार सुमारे अकरा लाख रुपयांचे नुकसानीची शक्यता आहे. या प्रकाराची नोंद ग्रामीण पोलिसांनी ठाण्यात झाली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. याचा अधिक तपास पोलीस हवालदार सुनील सावंत करीत आहेत. हरचिरी तलाठ्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे