(नवी दिल्ली)
राम रहीमची मुलगी हनीप्रीतला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीपला अटक करून दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळविली आहे. सिरसा पोलिसांचा दावा आहे की, आरोपी प्रदीपने लॉरेन्स बिश्नोईचा गुंड असल्याचे दाखवून खंडणी मागितली होती.
एएसपी दीप्ती गर्ग यांनी सांगितले की, सीआयए सिरसा आणि सदर सिरसा यांच्या संयुक्त पोलिस पथकांनी 5 एप्रिलला व्हॉट्सअॅपद्वारे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या घटनेतील आरोपींना अटक केली आहे. तक्रारदार हनीप्रीतने पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. हनीप्रीतने सांगितले की, 5 एप्रिलला माझ्या मोबाईलवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एक मेसेज आला. त्यात सांगितले की, मी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून दीपा बोलत आहे आणि मी चार लोकांना टार्गेट केले आहे. ज्यात तुमचे नाव आहे. तू मला 50 लाख रुपये दे, न दिल्यास जीवे मारण्यात येईल, असे धमकावले.
ही बाब एसपी उदयसिंग मीणा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत सदर सिरसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.