(रत्नागिरी)
रत्नागिरीतील प्रसिध्द जे. के. फाईल्स कंपनी बंद हाेण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. कंपनीमधील एकूण उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवणे कठीण जात असल्याच्या सूचना कंपनीने कामगारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीची नाेटीस लावण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जे. के. फाईल्स कंपनीच्या इंजिनिअरींग विभागाचे सीएचआरओ एम. व्ही. चंद्रशेखर यांनी १७ जून राेजी कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यात त्यांनी रत्नागिरीमधील प्लांट आणि मशिनरी खूप जुन्या झाल्या असून, अकार्यक्षम बनल्या आहेत. त्यामुळे अधिक चांगले तंत्रज्ञान व मशिनरीची आवश्यकता आहे. परंतु, व्यवस्थापनाला सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे म्हटले आहे.
सध्या युनियनचे पदाधिकारी येऊन कामगारांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कंपनीने लागू केलेली स्वेच्छानिवृत्ती योजना न स्वीकारण्याच्या मन:स्थितीमध्ये कर्मचारी असल्याचे समजते.